कळंभे गावातील ‘एसटी’चा मुक्काम हलला; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चाके रुतली!


निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर

वाई दि. २० : कळंभे (ता. वाई) गावातील एसटी बसचा मुक्काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. बसअभावी शैक्षणिक नुकसान होत असून, अनेक पालकांनी मुलींची शाळा बंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या गंभीर प्रश्नावर कळंभे गावचे सुपुत्र व माजी उपसरपंच हणमंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वाई आगार व्यवस्थापक युवराज कदम यांना निवेदनाद्वारे जाब विचारला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कळंभे गावातून धावणाऱ्या एसटी बसची सेवा विस्कळीत झाली आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, मात्र बसअभावी केंद्रावर वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. बस वेळेवर नसल्याने पायपीट करावी लागत आहे, परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव काही पालकांनी मुलींना शाळेत पाठवणे बंद केले आहे. ग्रामस्थांच्या मते, जर बसचे वेळापत्रक शाळा-कॉलेजच्या वेळेनुसार आखले, तर या मार्गावरून महामंडळाला चांगले उत्पन्नही मिळू शकते.
दरम्यान, “गावात मुक्कामी एसटी असणे ही चैनीची गोष्ट नसून ती विद्यार्थ्यांची गरज आहे. जर दोन दिवसांत मुक्काम सुरू झाला नाही, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेतील.” असे, हणमंतराव गायकवाड (माजी उपसरपंच, कळंभे) यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी वाई आगार प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर गावातील शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना यशवंत शिवथरे, डॉ. रणजीत गायकवाड, अनिल शिवथरे, मदन वाघ यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
आता विद्यार्थ्यांचे भविष्य आणि ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन आगार व्यवस्थापक तातडीने मुक्कामी बस सुरू करणार का? की कळंभे गावाला ‘लालपरी’साठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


66
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!