भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील 26 गावांत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना


निरंजना न्यूज नेटवर्क

भुईंज – भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील 26 गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात आज (दि. 10 मार्च 2026) भुईंज पोलीस ठाण्यात पोलीस पाटीलांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पोलीस ठाणे हद्दीतील 26 गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रत्येक गावातून तरुणांची निवड करून ग्रामसुरक्षा दल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दलाच्या सदस्यांना त्यांच्या कर्तव्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
गावांमध्ये चोरी, दरोडे किंवा इतर गुन्हेगारी घटना घडू नयेत यासाठी कोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी, तसेच गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ पोलीस ठाण्याला माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
ग्रामसुरक्षा दलाची प्रमुख कर्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत :
रात्रीच्या गस्तीवेळी पोलिसांना मदत करणे.
पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान सहकार्य करणे.
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पोलिसांसोबत समन्वयाने काम करणे.
चोरी, दरोडे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत करणे.
संकटाच्या काळात गावातील नागरिकांना मदत करणे.
बेकायदा दारू निर्मिती, विक्री तसेच अशा गैरप्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांबाबत गुप्त माहिती गोळा करून पोलिसांना कळवणे.
गावामध्ये नियमित गस्तीचे नियोजन करणे.
ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना कर्तव्य बजावताना विशेष पोलीस अधिकारीप्रमाणेच काही विशेष हक्क व कायदेशीर संरक्षण राहणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या उपक्रमामुळे गावपातळीवर सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.


66
कृपया वोट करा

निरंजना न्यूज नेटवर्कच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!