निरंजना न्यूज नेटवर्क – निलेश बाबर
वाई तालुक्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भुईंज व ओझर्डे पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटात परंपरागत विरोधक असणारे ना. मकरंद पाटील व मदनदादा भोसले यांच्यातच राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. गट व गणात असलेली ना. मकरंद पाटीलांची सत्ता धुळीस मिळवण्यासाठी मदनदादा भोसले व डॉ. सुरभी ताई भोसले-चव्हाण यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत भुईंज व ओझर्डे गट व गण ताब्यात घेण्याचा विडा त्यांनी उचलला आहे.
सध्या राज्यात महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन होणार नाही हे सर्वश्रूत आहे.व होणारही नाही अशी परिस्थिती सर्वत्र पहायला मिळते. वाई तालुक्यात असणारी दोन दशकां पासूनची राष्ट्रवादी गटाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भाजप, शिंदे शिवसेना, काँग्रेस, गटा मधील सर्व कार्यकर्त्यांनी मोर्चे बांधणीसाठी सुरुवात केली आहे. तर सत्ताधारी राष्ट्रवादी गटातील काही नाराज कार्यकर्त्यांनी भाजपशी सावधपणे छुपी हात मिळवणी केलेली आहे. त्यामुळे तिकीट वाटप करताना तालुक्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांना हे अवघड कोडे सोडवणे जिकिरीचे व जोखमीचे ठरणार आहे.
विरोधकांच्या रणनीतीमुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार आहेत. यंदाची जि.प. व पं.स. पंचवार्षिक निवडणूक सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांना काही अंशी जड जाणार आहे. त्यातच सत्ताधारी राष्ट्रवादी कार्यकर्त्याची गट व गणात वाढलेली मुजोरी त्यांच्याच नेत्यांना चांगलीच महागात पडणार असल्याचे मतदारराजा बोलत आहे.
भुईंज गट ना. मा. प्रवर्ग तर भुईंज गट व पाचवड गण सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने महिला राज अवतरले आहे. महिला राज असले तरी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बळ बांधले आहे. यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी गट आघाडीवर आहे. यांना रोखण्यासाठी मागील पंचवार्षिक निवडणुकीत भुईंज गटातील निसटलेली सत्ता पुन्हा काबीज करण्या साठी सध्या पडलेल्या आरक्षणाच्या संधीचं सोनं करण्याची वेळ मा.आ. मदनदादा भोसले यांच्याकडे चालून आली आहे. त्यामुळे भुईंज व ओझर्डे गट- गणां पराभवाचा वचपा काढण्यासाठी मदनदादा भोसले यांना सर्व नाराज कार्यकर्त्यांना घेवून प्रत्यक्ष स्वतः मैदानात उतरावे लागणार आहे. सद्यस्थितीत मदनबाण सोडला तरचं काहीतरी बदल घडवता येईल अन्यथा येरे माझ्या मागल्या…. अशी गत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंजळ व ओझर्डे या दोन गणांचा ओझर्डे गट हा मदत व पुनर्वसन मंत्री ना . मकरंद आबांचे होमपीच असल्याने नेहमी प्रमाणेच भाजप व इतर मित्र पक्षांना या पट्ट्यात जराही शिरकाव करता येणार नाही. त्यामुळे या गटासह दोन्ही गणांमध्ये राष्ट्रवादी एक हाती सत्ता काबीज करणार हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. तरीही राष्ट्रवादीला ओझर्डे गटात भाजप व इतर पक्षांना कमी लेखून चालणार नाही. येथील ओझर्डे गटात महिला सर्वसाधारण व गणांमध्ये ना. मा. प्रवर्ग महिला तर केंजळ गणात ना. मा. प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे. या गटातील ओझर्डे, कवठे, बोपेगाव, देगाव, केंजळ, पांडे, वेळे, गुळुंब या गावात अनेक मातब्बर नेत्यांची राजकीय वारसदार आहेत. असे असले तरी यावेळी भाजप व इतर पक्ष सत्ताधारी राष्ट्रवादी गटाला सळो की पळो करून सोडण्याची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. हे सत्ताधारी नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी विसरून चालणार नाही. एकूणच यंदाच्या निवडणुकीत कोण? बाजी मारणार हे येणारा काळच ठरवेल….











